Blog

मातीतील ओलावा टिकवा !

ज्यांच्याकडे शेतीसाठी पाण्याची व्यवस्था आहे त्यांच्यासाठी पाणी मातीमोल आहे.  ते प्रमाणापेक्षा जास्त पाणी देताहेत. जास्त पाण्यामुळे त्यांच्या पिकाचे नुकसानही होतेय,  पण कोरडवाहु शेतकऱ्यांसाठी या पाण्याची किंमत डोळ्यातील पाण्याएवढी आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास, ज्याच्याकडे मुबलक अन्न आहे तो अती खाल्ल्यामुळे परेशान आहे आणि ज्याच्याकडे टंचाई आहे, त्यांची उपासमार होतेय. ज्यांना बोअरवेल, विहीर आणि कालव्याचा आधार आहे, त्यांना पाण्याचे महत्व एवढ्या प्रकर्षाने जाणवत नाही, पण ज्या शेतकऱ्याला पिकांची तहान भागवण्यासाठी फक्त आकाशाकडे पाहावे लागते, त्याला मात्र संपूर्ण हंगामभर मातीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी कसरत करावी लागते. जमिनीत ओल टिकवणे का आवश्यक आहे? हा प्रश्न माणसाने पाणी का प्यावं या प्रश्नाएवढा बाळबोध आहे. पिकासाठी पाण्याची पहिली गरज त्यातला रस टिकवण्यासाठी आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, झाडाचं रक्त म्हणजे वनस्पतीच्या पेशीतील ‘प्रोटोप्लाझम’. प्रोटोप्लाझममध्ये ८० ते ९५ टक्के पाणी असतं. इथली पाण्याची पातळी कमी झाली कि हरितलवकांची अन्न बनवण्यासाठी क्षमता कमी होते. पाण्यामुळे झाडाच्या अन्नाचे वांदे होतात. जमिनीत योग्य ओल असल्यास सूक्ष्मजीवांची वाढ चांगली होते. या सूक्ष्मजीवांशी झाडाचे सहजीवन आहे. दोघेही ओल्या मातीत, एकदुसऱ्याच्या मायेच्या ओलाव्यात सुखाने नांदतात. जमिनीतील अन्नद्रवे विरघडवण्यासाठी आणि त्यांना झाडाच्या वेगवेगळ्या अवयवांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाण्याच्या प्रवाहाचीच गरज असते. हा प्रवाह मातीतून मुळांद्वारे शोषला जाऊन, खोडमार्गे पानाफुलांपर्यंत वाहत जातो.  या पाण्यामुळेच झाडाला आकार येतो. थोडक्यात पिकाच्या तब्बेतीसाठी, फुला, फळासाठी जमिनीतील ओल महत्वाची आहे. पाणी जमिनीत टिकवून ठेवणे हे शिकलेल्या पोराला शेतीव्यवसायात टिकवून ठेवण्याएवढे कठीण काम आहे. आपण दिलेल्या पाण्यापैकी एक टक्क्यांपेक्षाही कमी पाणी झाड पिते. बहुतांश पाणी वाहून जाते, जमिनीत लांब खोलवर झिरपतते किंवा सूर्याच्या तापाने उडून जाते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, मातीच्या प्रकारावर अवलंबून असते. गाळाची चिकणमाती सर्वात जास्त पाणी धरून ठेवते. जवळपास २० टक्क्यापर्यंत पाणी तिच्यामध्ये असते. सगळ्यात कमी पाणी, रेतीमय मातीत असते. जास्तीत जास्त सहा टक्के पाण्याला धरून ठेवण्याची ताकद तिच्यामध्ये असते. आता ही पाणी धरून ठेवायची ताकद मातीत येते तरी कुठून? आणि ती वाढवायची तरी कशी? जमिनीतील पाणी धरायची ताकद तिच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ किती आहेत? मातीचा थर किती मोठा आहे? तेथील मातीचा पोत कसा आहे? आणि मातीचं तापमान किती आहे? म्हणजे ती किती लवकर गरम आणि थंड होते? यावर अवलंबून आहे. मातीला जास्तीत जास्त पाणी धरून ठेवण्यासाठी सक्षम करा: जशी भविष्यासाठी आपण पैशाची तरतूद करून ठेवतो तशी पिकासाठी पाण्याची तरतूद करा. ती करणार कशी? तर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवून  आणि तिच्यातून निघून जाणाऱ्या पाण्याला अटकाव करून. मातीच्या दोन कणांमध्ये किती जागा आहे यावर, ती किती पाणी धरून ठेवेल हे अवलंबून असते. जेव्हा मातीत पाणी नसते तेव्हा ती जागा हवेने व्यापलेली असते. पण मातीत पाणी आल्याआल्या शहाण्या प्रवाश्याप्रमाणे हवा, ती जागा पाण्यासाठी मोकळी करून देते. म्हणून मातीत, पाण्याबरोबे हवाही धरून ठेवणे महत्वाचे आहे. कोणत्याही अडचणीवर तोडगा काढण्यासाठी काय करू नये आणि काय करावे? या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. सुरवातीला काय करू नये हे जाणून घेऊया. जमिनीतून निघून जाणारे पाणी वाचवण्यासाठी- १. पिकांमधील जमीन परतपरत उकरु नका. २. शेताचं फुटबॉल ग्राउंड करू नका. मातीला गुरं फिरवून किंवा चालूनचालून घट्ट करू नका. ३. जमिनीची धूप होणार नाही याची काळजी घ्या ४. अति तिथे माती या उक्तीप्रमाणे अति पाणी देऊन शेताची माती करू नका. ५. रासायनिक खते आणि तणनाशकांचा अतिवापर टाळा. आता ओलावा टिकवण्यासाठी काय करावं हे समजून घेऊया. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी खालील गोष्टी करायच्या आहेत. १. कंपोस्ट आणि सेंद्रिय खते वापरा. रासायनिक खते, अन्नद्रवे देतील पण पिकाला पाणी किंवा मातीला पाणी धरून ठेवण्याची ताकद देणार नाहीत. ती ताकद सेंद्रिय खतात आहे. २. जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वाढवा ३. मातीत सूक्ष्मजीवांची संख्या वाढवा. ४. कधी पाणी द्यायचं ते ठरवा. पाण्याचा अतिवापर टाळा. ५. जमिनीला उघडं ठेऊ नका. भूमातेला पालापाचोळ्याचं आच्छादन घाला. मल्चिंग करासे सर्व उपाय सोपे आणि स्वस्त आहेत. स्वस्त गोष्टींचं मोल नसत. पण इथं स्वस्तच मस्त आहे. जमिनीला आई म्हणतात, कारण ती लहानमोठे धक्के सावरत पिकाला सांभाळून घेते. आई जशी आपल्या मुलांसाठी खाऊ जपून ठेवते, त्यांच्या भविष्यासाठी अन्नाची तरतूद करून ठेवते, तशीच माती पिकांची भविष्याची गरज म्हणून अन्नपाणी धरून ठेवते. आपल्याला या काळ्या आईची तब्बेत जपायचीये. चला तर मग, आळसाचं आच्छादन दूर करून जमिनीला मल्चिंग करण्यासाठी बाह्या सारुयात. मातीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी मनातील ओलावा टिकवून ठेउयात.  मातीमोल या म्हणीचा अर्थ बदलत, मातीला ‘अमूल्य’ बनवूया.

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.