Blog

कीटकनाशकांचा रिझल्ट कसा ओळखावा?

पूर्वी नवीन कीटक नाशकाची ट्रायल घायची असल्यास, त्या प्रॉडक्टचे लहान बाटल्यातले नमुने आम्ही शेतकऱ्यांना द्यायचो. ४-५ शेतकऱ्यांच्या शेतात ट्रायल घ्यायचा कार्यक्रम असायचा. शेतकऱ्याच्या उपस्थितीत औषध शेतात फवारायचो. दररोज निरीक्षण करा आणि आम्हाला रिझल्ट सांगा असं बजावून आम्ही परतायचो. ३-४ दिवसांनी फोन करून रिझल्ट विचारल्यावर वेगवेगळी उत्तरे मिळायची.  जो शेतकरी सकारात्मक असायचा तो रिझल्टच्या बाबतीत भरभरून बोलायचा. अगदी कमी रिझल्ट असला तरी. पण जो नकारात्मक होता किंवा आम्ही दिलेल्या प्रॉडक्ट च्या माहितीशी सहमत नव्हता तो कीटकनाशकाचा चांगला परिणाम असुनही ‘तुमच्या प्रॉडक्टला कसा रिझल्ट नाही’ ते पटवुन द्यायचा प्रयत्न करायचा. थोड्याफार प्रमाणात शेतीरासायनांच्या रिझल्टच्या बाबतीत अश्या गोष्टी घडतात. ट्रायलच्या आगोदर प्रॉडक्टची जोरदार, मीठमसाला लाऊन माहिती सांगितली की फवारल्यानंतर रिझल्ट चांगला आला असा भास व्हायला लागतो. मानसशास्त्रातील काही गमती इथं काम करतात. काही शेतकरी मुळातच सकारात्मक असतात. त्यांना महाभारतातील धर्मराजासारखं सगळं चांगलं दिसते. काही याच्या उलट असतात. कितीही रिझल्ट आला तरी तुमच्या प्रॉडक्ट ला रिझल्ट नाही हे त्यांचे ठाम मत असते. यशस्वी कीडनियंत्रणासाठी या मानसिक खेळात न गुंतता शास्त्रीय पद्धतीने रिझल्ट पाहणे आवश्यक आहे. कीटकनाशकाचा रिझल्ट येणे, म्हणजे काय? आणि तो कसा बघावा? या प्रश्नांची उत्तरे मिळवायचा प्रयत्न आजच्या लेखातून करूया. १. स्कॉऊटिंग करा- शेतात कीटकनाशक फवारायच्या आगोदर ‘स्कॉऊटिंग’ करणे आवश्यक आहे. स्कॉऊटिंग या इंग्रजी नावाने गोंधळून जाऊ नका. आपल्या शेतात कोणते, किडे किती प्रमाणात आहेत याचा शोध म्हणजे स्कॉऊटिंग. फवारण्या आगोदर शेतात फेरफटका मारा. पानांच्या खालच्या बाजूला, फुलात, फळांवर काळजीपूर्वक तपासा. किड्याच्या नुकसानीचे लक्षणं तपासा. उदारणार्थ रस शोधणारे किडे पानातील रस शोषतात, त्यामुळे पान निस्तेज आणि पिवळे पडते, थ्रिप्स फळ, पान, कोंबाला खरवडून काढतात, हेलिओथिस अळी पणाला कुरतडते किंवा फळ पोखरते आणि स्पोडोप्टेरा आणि डीबीएम अळी पानाची जाळी बनवतात. स्कॉउटिंग मुळे आपल्याला किडीची तीव्रता समजते. २. आर्थिक नुकसान पातळी काढा: शेतातील स्कॉउटिंग झाल्यावर आपल्याला तो कीडा आर्थिक नुकसान पातळीखाली आहे की नाही ते समजते. ‘आर्थिक नुकसान पातळी’ म्हणजे, त्या किड्याची संख्या किंवा त्याची लक्षणे एका झाडावर किती आहेत? त्यामुळे आपले आर्थिक नुकसान होणार आहे का? प्रत्येक किड्याची, त्या त्या पिकासाठीची आर्थिक नुकसान पातळी ठरलेली असते. त्या पातळीच्या वर जर किडा किंवा त्याची लक्षणे असतील तरच फवारणी करायची. ३. कोणते प्रॉडक्ट वापरावे ते ठरवा: अर्थीक नुकसान पातळी काढल्यावर आपण फवारले पाहिजे असा निर्णय झाला असेल तर सर्वात आगोदर कोणते कीटकनाशक फवारावे ते ठरवावे लागेल. जर रस शोधणारी कीड असेल तर आंतरप्रवाही कीटकनाशक फवारावे. अळी असेल तर पोटविष किंवा स्पर्शजन्य विष आणि कीड पांढऱ्या माशीसारखी उडणारी असेल तर फ्युमिगंट म्हणजे विषारी वास येणारे कीटकनाशक वापरावे. ४. कीटकनाशक ठरवतांना पिकाच्या कोणत्या भागावर काम करते? ते तपासा. काही कीटकनाशक मुळावाटे शोषले जातात तर काही पाणावाटे. किडा कुठे लपला आहे ते पाहून कीटकनाशनाची निवड करावी. ५. फवारणी केल्यानंतर आपण वापरलेल्या कीटकनाशकाचा किती वेळात रिझल्ट येतो ते समजून घ्या. बऱ्याचदा आपण फार लवकर किंवा उशिरा रिझल्ट पाहतो आणि त्यामुळे आपलं गणित चुकायची शक्यता असते. ६. फवारून झाल्यावर किती किडे मेले ते पहा. मेलेले किडे पानावर किंवा झाडाखाली जमिनीवर पडलेले दिसतील. अळ्या किंवा मोठ्या किड्यांच्या बाबतीत हे मोजणं शक्य आहे. पण थ्रिप्स, लाल कोळी यासारखे किडे जमिनीवर मिळतील याची शाश्वती नाही. पानावर मरून पडलेले लहान किडे वाऱ्याने उडून जायची शक्यता असते. ५. कडुलिंबासारखे कीटकनाशक किडीला मारत नाही तर तिच्या पुढच्या पिढ्या निष्फळ करायचे काम करते. त्याच्यामुळे अंडी मारतात आणि किडा नपुसंक होतो. म्हणून अश्या कीटकनाशकात मेलेले किडे आपल्याला सापडणार नाहीत. ७. किडीच्या नुकसानीची लक्षणे तपास: जर कीड नियंत्रण झाले असेल तर तिचे पिकावरील लक्षणे देखील कमी होतील. ही लक्षणे नवीन फुटीवर तपासता येतील. जर नवीन पानांवर आणि कोंबावर किड्याचे लक्षणं नसतील तर तुम्ही वापरलेले कीटकनाशकाचा नेम योग्य जागी लागला असे समजावे. ५. किड्याच्या इतर अवस्था अंडी, अळी, कोष यांच्या संख्येत काय फरक जाणवतोय का? ते तपासा: फवारण्याआगोदर जेवढे किडे आणि त्याच्या इतर अवस्था पिकावर दिसत होत्या त्यात काही फरक जाणवतो का ते तपास. आपण जर अंडीनाशक वापरले असेल तर अंडी कमी होतील पण कोष आणि अळी जिवंत असू शकते. याउलट अळीनाशक वापरले असेल तर अंडी जिवंत राहण्याची शक्यता आहे. ६. निरीक्षणासाठी कामगंध सापळे, चिकट ट्रॅप, प्रकाश सापळे वापर करा: फवारल्यानंतर शेतात जिवंत असलेल्या किड्यांची संख्या मोजण्यासाठी शेतात कामगंध, चिकट आणि प्रकाश सापळे लावावे. फवारल्या नंतर सापळ्यात अडकणारे किडे कमी झाले असतील तर तुमचा फवारा कामी आला असं समजा. वरच्या गोष्टी केल्यामुळे आपल्या शेतात किती किडे होते आणि फवारल्यानंतर त्यातील कीतींचे नियंत्रण झाले हे स्पष्ट होईल. रिझल्टचा अंदाज बांधून हवेत तीर मारण्यापेक्षा, शास्त्रीय मीमांसा करून कीटकनाशकाचा परिणाम तपासणे शहाणपणाचे आहे. click here for more details :- www.greenvisionindia.com our facebook page :- https://www.facebook.com/greenvisionlifesciences